नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील सर्वांत व्यस्त मार्गावर मोठे बदल करणार आहे. यामध्ये मुंबईतील तीन मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर माहिती दिली. भारतीय रेल्वे आपल्या सर्वांत व्यस्त रेल्वे नेटवर्कमधील सुमारे ११ हजार किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची तयारी करत आहे. देशातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्गांवर ट्रेन क्षमता वाढवणे, गर्दी कमी करणे, प्रवासी व मालगाड्यांची वाहतूक सुलभ करणे, हा यामागील उद्देश आहे. मुंबई-दिल्लीसह दिल्ली-हावडा, हावडा-चेन्नई, चेन्नई-मुंबई, दिल्ली-चेन्नई, मुंबई-हावडा, दिल्ली-गुवाहाटी रेल्वेच्या या सात प्रमुख जास्त गर्दीच्या मार्गांमध्ये खालील मार्गाचा समावेश
भारतीय रेल नेटवर्कवर प्रवासी आणि मालगाडी सेवांमध्ये भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन ही योजना विकसित केली जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील ७ सर्वांत व्यस्त रेल्वे मार्ग रेल्वे वाहतुकीचा एक महत्त्वपूर्ण भाग हाताळतात. या मार्गांची एकूण लांबी अंदाजे ११ हजार किलोमीटर आहे. देशाच्या एकूण रेल्वे वाहतुकीमध्ये या ७ मार्गांचा वाटा सुमारे ४१ टक्के आहे. ही योजना वाहतुकीला पर्यावरणीय आणि आर्थिक या दोन्ही दृष्टिकोनातून फायदेशीर असल्याचेही सांगण्यात आले आहे.
रेल नेटवर्कचे चौपदरीकरण करण्याचा मोठा फायदा
या व्यस्त मार्गांवर अतिरिक्त मार्गांच्या बांधकामामुळे रेल्वे वाहतूक सुलभ होईल आणि विद्यमान रुळांवरील ताण कमी होईल, असे म्हटले गेले आहे. रेल नेटवर्कचे चौपदरीकरण करण्याचा थेट फायदा म्हणजे एकाच मार्गावर अधिक ट्रेन चालवण्यासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होते. यामुळे प्रवासी आणि मालगाड्या या दोन्हींचे संचालन अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल. अतिरिक्त ट्रॅकमुळे ट्रेन जास्त वेळ एकामागोमाग एक थांबवून ठेवण्याची गरज कमी होते. देखभाल किंवा तांत्रिक समस्यांच्या वेळी वाहतूक इतर ट्रॅकवर वळवण्याचा पर्यायही उपलब्ध होतो, असे सांगितले जात आहे.
कवच ४.० चा विस्तार केला जात आहे
जास्त गर्दीच्या मार्गांवर केवळ रेल्वेमार्गाची क्षमताच वाढवली जात नाही, तर रेल्वे सुरक्षा आणि सिग्नलिंग प्रणाली अद्ययावत केली जात आहेत. स्वदेशी स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली, कवच ४.० चा विस्तार केला जात आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरवर एकूण २,४९० मार्ग किलोमीटरवर कवच ४.० कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. कवच ४.० च्या नवीन आवृत्तीमध्ये अधिक अचूक रेल्वे स्थान ट्रॅकिंग, मोठ्या रेल्वे यार्डमधील सुधारित सिग्नलिंग माहिती आणि ऑप्टिकल फायबर केबलद्वारे स्टेशन-टू-स्टेशन इंटरफेस यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे विद्यमान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालींसोबत थेट एकत्रित केले जाऊ शकते.